Maharashtra Political Crisis : 
फडणवीसांनी केला राज ठाकरेंना फोन

Maharashtra Political Crisis : फडणवीसांनी केला राज ठाकरेंना फोन

ठाकरे सरकारला पाडण्यासाठी भाजपने आता कंबर कसली असून प्रत्येक मतांसाठी गणित मांडत आहे

मुंबई : सत्तानाट्यामध्ये आता प्रचंड वेगानं घडामोडी घडत असून राज्यापालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगितले आहे. यानुसार उद्या महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार यावर निर्णय होणार आहे. ठाकरे सरकारला पाडण्यासाठी भाजपने आता कंबर कसली असून प्रत्येक मतांसाठी गणित मांडत आहे. यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून बहुमत सिद्ध करा, असे आदेश दिले आहेत. राज्यपालांचं पत्र हाती पडताच शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर आज सायंकाळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तरीही राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 जूनला होणार असल्याची सूचना जारी केली आहे. यामुळे एकेका मताची जुळवाजुळव दोन्हीही पक्षांकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी सर्व पक्षांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. अशात इतके पडद्यामागून हालचाली करणारे देवेंद्र फडणवीस चांगलेच अॅक्टीव्ह झाले असून अधिक संख्याबळासाठी प्रतत्न सुरु केले आहेत. यासाठीच फडणवीसांनी राज ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याआधीही एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दोनदा फोन केला होता.

राज ठाकरेंच्या मनसेचा विधानसभेत एकमेव आमदार राजू पाटील आहेत. या आमदाराच्या पाठिंब्यासाठी फडणवीस यांनी राज यांना फोन केला. तर, फ्लोअर टेस्टवेळी मनसे भाजपाच्या बाजूनं मतदान करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, याआधीही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही मनसेने भाजपला पाठिंबा दर्शविला होता. आता फ्लोअर टेस्टमध्येही मनसे भाजपला साथ देणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान, राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवत ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार आहे. यामुळे आता शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक उद्या आमनेसामने येण्याची शक्यता आहे. यानुसार मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com