अमोल मिटकरी हे राजकारणातील विचारांचा काळा डाग; महेश शिंदेंचा घणाघात

अमोल मिटकरी हे राजकारणातील विचारांचा काळा डाग; महेश शिंदेंचा घणाघात

शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरले असून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला

मुंबई : शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरले असून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आले असता धक्काबुक्की झाली. अशात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी शिंदे गटावर गंभीर आरोप केले. यावर अमोल मिटकरी हे राजकारणातील विचारांचा काळा डाग आहे, अशी टीका शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाचे आमदार आमच्या अंगावर आले. त्यांनी आम्हाला आईबहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोप केला होता. विधानसभेतील घटनेवर महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्ही आंदोलन करत होतो. विरोधकांनी आमच्या आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. गाजरं आणली, काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. अमोल मिटकरी हे राजकारणातील विचारांचा काळा डाग आहे. अमोल मिटकरी लोकशाही विचारांचा नाही. त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

तसेच, आमचे पक्ष प्रतोद आणि आम्ही सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली आहे. आम्ही हे प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेऊ. विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.

दरम्यान, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारीच आज आंदोलन करताना पाहयला मिळाले. सत्ताधाऱ्यांनी लवासाचे खोके, एकदम ओके, बीएमसीचे खोके एकदम ओके, वाझेचे खोके एकदम ओके, अशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधक तेथे आले असता सत्ताधारी आमदारांसोबत धक्काबुक्की झाली. यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत आमदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com