Video : मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडला राजापूरातील हातिवले टोलनाका

मनसे तालुका अध्यक्षांसह उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

निस्सार शेख | चिपळूण : दोन दिवसांपुर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शासनावर आसूड ओढला होता. चांद्रयान तीन चंद्रावर पाठवण्याऐवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते. चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे पहा, असा टोला त्यांनी लगावला होता. अशातच, गुरुवारी सायंकाळी राजापूर-हातिवले येथील टोल नाका मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी मनसे राजापूर तालुका अध्यक्ष पंकज सिताराम पंगेरकर व उपाध्यक्ष जयेंद्र विलास कोठारकर यांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.

गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच सध्या मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्याची लगबग सुरु असतानाही अद्यापही शासन व प्रशासन महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी आपला राग राजापूर-हातिवले येथील टोल नाक्यावर काढला आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत अचानक हातिवले येथील टोलनाक्याकडे आपला मोर्चा वळवला. या टोलनाक्यावरील केबिनची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली असून केबिनच्या काचाही फोडल्या आहेत.

मुंबई-गोवा माहामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी व गेली १७ वर्ष सुरु असणारे काम, त्यातच यावर्षी महामार्गाची झालेली चाळण यामुळे कोकणवासियांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी सायंकाळी उशिरा राजापूर तालुका मनसे अध्यक्ष पंकज सिताराम पंगेरकर (वय ३४) व मनसे तालुका उपाध्यक्ष जयेंद्र विलास कोठारकर (वय ३८) यांना तात्काळ ताब्यत घेतले आहे. चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com