शंभर खोके दर महिन्याला मातोश्रीवर जायचे; शिंदे गटातील खासदाराचा आरोप

शंभर खोके दर महिन्याला मातोश्रीवर जायचे; शिंदे गटातील खासदाराचा आरोप

शिंदे गटातील खासदाराचा उध्दव ठाकरेंवर थेट आरोप

बुलढाणा : शंभर खोके दर महिन्याला मातोश्रीवर जात असल्याचा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून पुन्हा नवा वाद सुरु होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमात मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले. 50 खोके एकदम ओके म्हणताना "शंभर खोके मातोश्री ओके" तेही दर महिन्याला जात असत, सचिन वाझे पैसे जमा करून मातोश्रीवर पाठवत होते. त्यातील अनिल देशमुख आणि वाझे हे कुठे आहेत, असा थेट आरोप उद्धव ठाकरेंवर जाधव यांनी केल आहे.

दरम्यान, आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना 50 खोके एकदम ओके, म्हणून हिणवले जात आहे. मात्र, आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच "शंभर खोके एकदम ओके" तेही दर महिन्याला म्हणून आव्हान दिले आहे. प्रतापराव जाधव यांच्या विधानाने राजकारणात एकच खळबळ माजवली आहे. त्यामुळे या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर, यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com