पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मान शरद पवारांनी राखला; अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला मागे
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणासह राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या आक्रोशामुळे, आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा केली.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
लोक माझे सांगाती' ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती. परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे 'सांगाती' असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा. याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते , असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने , काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. असे पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, 'लोक माझे सांगाती' हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने 'मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे' या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुनश्च: अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.