ओडिशाचे आरोग्य मंत्र्यांवर जीवघेणा हल्ला; पोलिसानेच केला गोळीबार
नवी दिल्ली : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी त्यांना भुवनेश्वर येथे एअरलिफ्ट करण्यात येणार आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर भागात आज दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्यानेच नाबा कुमार दास यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.
माहितीनुसार, एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नाबा दास त्यांच्या कारमधून बाहेर आले. आणि पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर नाबा दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी एअर लिफ्ट करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी तणाव वाढला असून बीजेडीचे कार्यकर्ते धरणेवर बसले आहेत.
ओडिशाच्या कॅबिनेट मंत्र्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाळ दास असे असून ते गांधी चौकात तैनात होते. गोपाळ दास यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून नाबा दास यांच्यावर 4 ते 5 राउंड फायर केले. गोपाळ दास यांना पकडण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु, गोपाळ दास यांनी नाबा दास यांच्यावर गोळीबार का केला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्यावरील हा हल्ला पूर्वनियोजित होता, कारण मंत्र्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचे मानले जात आहे. या घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोण आहेत नबा किशोर दास?
नाबा किशोर दास हे ओडिशातील झारसुखडा जिल्ह्यातील प्रभावशाली नेते आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते, तेथून नबा दास यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला. नवीन पटनायक यांनी त्यांच्या सरकारमध्ये आरोग्य विभागासारखे मोठे खाते त्यांच्यावर सोपवले आहे. दरम्यान, नाबा दास नेहमीच चर्चेत असतात. नाबा दास नुकतेच महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर मंदिरात १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीचा कलश दान केला. तर, 2015 मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात नब किशोर दास पॉर्न पाहताना पकडले गेले होते. यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते. परंतु, नाबा दास यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.