आरक्षणासाठी जाती-धर्मांची भांडणं लावून कुणी फायदा घेवू नये; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?
ओंकार कुलकर्णी | धाराशिव : मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहेत. तर, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणासाठी जाती-धर्मांची भांडणे लावून कुणी फायदा घेवू नये, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. यामुळे पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे, यावरुन चर्चांना उधाण आले आहे.
पंकजा मुंडे या शिवशक्ती परीक्रमा यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसीय धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती असून आज त्यांनी उमरगा तालुक्यामध्ये गाठीभेटी घेतल्या. तर तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आरक्षणासाठी जाती धर्मामध्ये भांडण लावून कोणी त्याचा फायदा घेऊ नये, असे मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केले आहे. तर, माझ्या मनामध्ये काहीही नसते. माझे मन काचेसारखे स्वच्छ आहे. तुळजाभवानीची कृपा आमच्यावरती आहे. मुंडे साहेबांनी ही प्रत्येक दौरा तुळजापूरपासून सुरू केलेला होता. त्यामुळे तुळजाभवानीचा आशीर्वाद आम्हाला पहिल्यापासूनच आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला भेटण्यासाठी मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ हे मुंबईला रवाना झाले आहे. यावेळी सरकारच्या वतीने सर्व खर्च करण्यात आला आहे. अर्जुन खोतकर यांच्यासह हे 6 जणांचे शिष्टमंडळ हे मुंबईला काही वेळात दाखल होतील. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.