पुणे प्रकरणावर शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका म्हणाले, आता कुठल्या बिळात बसला आहात?
काही दिवसांपूर्वी एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी पीएफआय संस्थेविरुद्ध टाकलेल्या छाप्यांविरोधात पीएफआय कॅडर एकत्र आले होते. आंदोलना दरम्यान, शुक्रवारी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांकडून पाकिस्तानच्या समर्थानात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर हे प्रकरण राज्यात प्रचंड तापले आहे. या प्रकरणावर सर्वच राजकीय पक्ष सध्या आक्रमक झालेले असताना या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेवर लक्ष साधत जोरदार टीका केली आहे.
पुणे प्रकरणावर बोलताना भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पीएफआयचा देशविरोधी कट उघड, पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा. मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या. हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या. सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे. उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? अशी टीका त्यांनी यावेळी ट्विटरवर केली.
या ट्विटनंतर लगेच त्यांनी दुसरे ट्विट केले त्यामध्ये त्यांनी लिहले की, इतिहासातील खानांची सदैव "उचकी" लागणारे भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले. संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे "होर्डिंग" लावणारे. आता पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत! आता कुठल्या बिळात बसला आहात? अश्या शब्दात त्यांनी बोचारी टीका केली.