2 तासांच्या भाषणात मणिपूरचा केवळ 2 मिनिटे  हसत-हसत उल्लेख; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

2 तासांच्या भाषणात मणिपूरचा केवळ 2 मिनिटे हसत-हसत उल्लेख; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदींनी 2 तास 13 मिनिटांच्या भाषणात फक्त 2 मिनिटे मणिपूरवर बोलले. या 2 मिनिटांतही पंतप्रधान हसत हसत मणिपूरची खिल्ली उडवत होते. मणिपूरची खिल्ली उडवणे योग्य नाही, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, मी 19 वर्षांपासून राजकारणात आहे. पण, मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत पाहिले नाही. मणिपूर दोन भागात विभागले गेले आहे. मी मणिपूरच्या कुकी भागात गेलो तेव्हा मला स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, तुमच्या संरक्षणाच्या ताफ्यात कोणीही मैतेई असू नये, अन्यथा आम्ही त्याला ठार मारू. तसेच मैतेई परिसरात गेल्यावर मला सांगण्यात आले की, कुकी तुमच्यासोबत असू नये, अन्यथा लोक त्याला ठार मारतील.

भारतीय लष्कर दोन दिवसात या संपूर्ण हिंसाचारावर नियंत्रण मिळवू शकते. मात्र, पंतप्रधानांनी नकार दिला. पंतप्रधानांना आग विझवायची नाही, त्यांना स्वतः मणिपूर जाळायचे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. संसदेत पंतप्रधान विनोदाच्या मोडमध्ये होते, अशीही टीका त्यांनी मोदींवर केली आहे.

मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली आणि पंतप्रधान त्यांच्या घोषणा देत होते. मणिपूरमधील हिंसाचार थांबवणे हे आमचे काम आहे. जिथे जिथे भारत मातेवर हल्ला होईल तिथे मी बचावासाठी उभा आहे. देशाच्या रक्षणासाठी मी प्रत्येक आघाडीवर उभा राहीन, असेही राहुल गांधींनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com