ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडं जावं; लोकशाही पॉडकास्टमध्ये नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया

ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडं जावं; लोकशाही पॉडकास्टमध्ये नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे. नार्वेकरांनी लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार यामध्ये एक्सक्लुझिव्ह मुलाखत देत अनेक गोष्टींचा उलगडा केला.

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यासोबत ठाकरे गटाचेही आमदार पात्र ठरवले आहेत. यानंतर राहुल नार्वेकरांनी लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार यामध्ये एक्सक्लुझिव्ह मुलाखत देत अनेक गोष्टींचा उलगडा केला.

ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडं जावं; लोकशाही पॉडकास्टमध्ये नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया
LOKशाही मराठीची प्रक्षेपणबंदीविरोधात कोर्टात धाव; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

राहुल नार्वेकरांनी भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोर्टाने अवैध ठरवली आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की राजकीय पक्षाचा प्रतोद त्यांचा इच्छेनुसार असावा. कोर्टाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज पसरवला जातो आहे. ​​कोर्टाने तीन मुद्यांवर राहुन निकाल घ्यायला सांगितलं होतं. कोर्टानं निकष दिले त्यानुसार मी निकाल दिला. निवडणूक आयोगाला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांच्याकडे 1999 ची घटना होती. राजकीय पक्ष संघटनात्मक रचनेला गांभीर्यानं घेतील. पक्षांतर्गत लोकशाही पाळलीच पाहिजे. कुणाला वाईट वाटेल याचा विचार केला नाही. नियम पाळून महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला. कालच्या निर्णयानं संसदीय लोकशाही बळकट झाली, असे नार्वेकरांनी सांगितले आहे. ​

ज्याला चुकीचं वाटत असेल त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, असे म्हणत नार्वेकर म्हणाले, जे पुरावे माझ्यासमोर होते त्यानुसारच मी निर्णय घेतला. निव्वळ आरोप करण्यापेक्षा यात चुकलं काय हे दाखवा. मोठंमोठं शब्द वापरुन मैदानात भाषण करणे सोप्पे आहे. परंतु, निर्णय चुकीचा हे सिद्ध करणं सोपं नसतं, असेही नार्वेकर म्हणाले आहेत. तर, लवकरात लवकर निर्णय देण्याचा माझा प्रयत्न होता. सुनावणीसाठी 14 ते 16 तास काम केलं. या निर्णयासाठी लागलेला वेळ स्वाभाविक आहे. ​जो निर्णय कायदेशीर बाजू बघून घेतला तो राजकीय प्रेरित कसा असू शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरुन होत असलेल्या आरोपांनाही राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. विधानसभेच्या अध्यक्षासोबत मी विधीमंडळ बोर्डाचाही अध्यक्ष आहे. यात मुख्यमंत्रीही सदस्य आहेत. विधीमंडळ बोर्डाचे प्रश्न सोडवणे ही माझी जबाबदारी आहे. यासोबतच मी आमदार म्हणूनही काम करत असतो. मतदारसंघातील काम पूर्ण करण्यासाठी विधीमंडळातील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट व्हायची. अध्यक्षांनी मतदारसंघात कामं करु नये का, असा सवाल नार्वेकरांनी केला आहे.

मी काही रात्री लपून-छपून खासगी वाहनातून रुप बदलून भेटायाल गेलो नव्हतो. मी मुख्यमंत्र्यांची अधिकृत अपॉइंटमेंट घेऊन भेटायला गेलो होतो. मुख्यमंत्री शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा झाली नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. माझी आणि मुख्यमंत्र्यांची भेट हा विषय मोठा करुन माझ्यावर दबाव टाकायचा प्रयत्न होता, असा आरोप नार्वेकरांनी यावेळी केला. मी कोणत्याही दबावाला बळी पडलो नाही. कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहेना. यामुळे या गोष्टीचा जास्त विचार करत नाही, असेही नार्वेकर म्हणाले आहेत.

सामान्य माणसांचा लोकशाहीवरील विश्वास बळकट करणे, असा निर्णय घेणं अपेक्षित होते. माझ्यासमोर हेच ध्येय होते. कालच्या निर्णयामुळे संसदीय लोकशाही बळकट झाली. मी कायद्यांच्या आधारावर निर्णय दिला. मी या निकषापर्यंत का आलो याचे स्पष्टीकरणासहीत निर्णय दिला आहे, असेही नार्वेकरांनी सांगितले.

ठाकरे गटाचेही आमदार पात्रतेवरुन यावरुन प्रश्न विचारला असता नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्र करताना व्हिप कधी काढला आणि तो योग्य वेळेत आमदारांपर्यंत पोहोचवला का? त्या व्हिपच्या विरोधात जाऊन मतदान केले का, हे पाहणे महत्वाचे आहे. भरत गोगावलेंनी व्हिप काढला असला तरी त्यांनी योग्य वेळेत आमदारांना दिला होता, याचे पुरावे नव्हते. यामुळे ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करणे शक्य नव्हते. तसेच, विधीमंडळ गट म्हणून माझ्याकडे एकच शिवसेना विधीमंडळ गटाची नोंद आहे. या शिवसेनेने फुट पडल्याचा कोणताही पत्रव्यवहार माझ्यासोबत केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com