राज ठाकरे दसरा मेळाव्याच्या वादापासून दूरच; दसऱ्यादिवशी असणार पुण्यात
अमोल धर्माधिकारी | पुणे: राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष, शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत सुरू असलेला वाद, दसरा मेळाव्यावरून राज्याच्या राजकारणातील वादंग या सर्व बाबींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फारसं भाष्य केलेलं नाही. मात्र, राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील असं भाकित अनेकांकडून वर्तवलं जात होतं. तसंच, राजकीय वर्तुळातही या विषयाची जोरदार चर्चा होती. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे दसऱ्या दिवशी पुण्यात असणार आहेत.
राज ठाकरे यांचा पुणे दौरा:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर
राज ठाकरे यांचा यंदाचा दसरा सण पुण्यातील निवासस्थानी होणार
4 तारखेला राज ठाकरेंचा पुणे दौरा
6 ऑक्टोबरला रात्री कोकण दौऱ्याला रवाना होण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर पुण्यात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचीही शक्यता
राज ठाकरे कोणाच्याही मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत:
दरम्यान, राज ठाकरे हे 3 दिवस पुणे दौऱ्यावर जाणार असल्याने 'राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार' अश्या चर्चांना आता पुर्णविराम लागला आहे. 4,5,6 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. दसरा 5 तारखेला असल्याने राज ठाकरे दसऱ्यादिवशीही पुण्यातच असतील हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. यामुळे, राज ठाकरे हे राज्यातील सत्तानाट्यापासून व संघर्षापासून दूर राहून मनसेच्या पुनर्बांधणीसाठी सक्रिय झाल्याचं चित्र स्पष्ट दिसतं आहे.