'राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत नाही दम, म्हणूनच आम्हाला नाही गम'

'राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत नाही दम, म्हणूनच आम्हाला नाही गम'

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर रामदास आठवलेंचा काव्यमय शैलीत निशाणा

जुई जाधव | मुंबई : माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत काही दम नाही आणि या यात्रेचा आम्हाला काही गम नाही. राहुलजींच्या नेतृत्वात जोर नाही; म्हणून एनडीएच्या जीवाला घोर नाही. कारण मोदींच्या नेतृत्वात भाजप कुठेही कमजोर नाही, अशा काव्यमय शैलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीकेचा निशाण साधला.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे. खरेतर राहुल गांधी यांनी काँग्रेस जोडो यात्रा काढली पाहिजे. काँग्रेसमधून रोज त्यांचे लोक बाहेर पडत आहेत. काल गोवा येथे काँग्रेसचे 8 आमदार काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. देशभर काँग्रेस तुटत आहे. गलितगात्र झालेल्या काँग्रेसला, जागोजाग तुटलेल्या काँग्रेसला पुन्हा जोडले पाहिजे. भारत तर मुळात अखंड उभा आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे विविध जाती, धर्म, भाषा प्रांताचा भारत एकसंघ जोडला गेला आहे. याची राहुल गांधी यांनी जाणीव ठेवली पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीतून केंद्र सरकार भारत एकसंघ ठेऊन आहे. भारत प्रगतीपथावर आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासमोर राजकीय आव्हान उभे राहू शकत नाही, असा टोला रामदास आठवले यांनी आज राहुल गांधी यांना मुंबईत लगावला.

Lokshahi
www.lokshahi.com