आम्हाला आहे सर्व गोष्टींचे भान म्हणूनच नरेंद्र मोदींनी...; रामदास आठवलेंची विशेष कविता
संजय राठोड | यवतमाळ : कांदा प्रश्नांवरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका केली आहे. तर, कवितेच्या माध्यमातून चांद्रयान मोहिमेची महतीही त्यांनी सांगितली आहे. त्यांची कविता आता चर्चेत आली आहे.
भारत देशाचे सर्व सायंटीस्ट आहे आमची जान, म्हणूनच चंद्रावर पाठविले चंद्रयान. आम्हाला आहे सर्व गोष्टींचे भान म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी पाठविले चंद्रावर यान, अशाप्रकारे कवितेतून चंद्रयान मोहिमेची महती सांगितली.
विरोधकांनी एकत्र यावे, त्याला कुणाचा विरोध नाही. लोकशाहीत जनतेचा कौल मान्य आहे. मोदी सरकारने देशात विकासात्मक काम केले आहे. लहान पक्षांनाही न्याय देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप लहान पक्षाला संपविते, असा विरोधकांकडून होणारा आरोप चुकीचा आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली. अशी ऑफर देण्याला काही अर्थ नाही. उध्दव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावे त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
शिवसेना फोडली नाही. तर उध्दव ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्याने फुटली आहे. ठाकरे हे भाजपसोबत असते तर शिवसेना फुटलीच नसती, असेही आठवले म्हणाले.
संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही. कायद्यात बदल करण्याचा अधिकार संविधानाने संसदेला दिला आहे. एनडीए संविधान बदलणार नाही, तर आणखी मजबूत करणार आहे. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचा आरोप आठवले यांनी केला.