आमदार भास्कर जाधव यांना दिलासा, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

आमदार भास्कर जाधव यांना दिलासा, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, राणेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप
Published by :
Sagar Pradhan

निसार शेख|रत्नागिरी: ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश व नितेश राणेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी न्यायालयाने त्यांना हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

नेमके प्रकरण काय?

कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध चाललेल्या एसीबी कारवाई विरुद्ध भास्कर जाधव यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी भाषणामध्ये भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश व नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजप कार्यकर्त्याने सामाजिक भावना भडकावल्याचा आरोप करत भास्कर जाधव यांच्याविरोधात डेक्कन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात आमदार भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून हंगामी अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

राणेंवरील टीका वैयक्तिक

आमदार भास्कर जाधव यांच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी ॲड. ठोंबरे यांनी न्यायालयाला सांगितले की, भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांविरुद्ध वैयक्तिक टीका केली होती. भास्कर जाधव यांनी कोणत्याही समाज,जात, धर्माविरुद्ध टीका केली नाही. तसेच, भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्यासाठीच त्यांच्यावर खोटी कलमे लावून राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आला.भास्कर जाधव यांच्या वकिलाचा युक्तीवाद मान्य करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी काही अटी व शर्तींवर आमदार भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यातर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड. संदीप जाधव यांनी काम पहिले.

जाधवांविरोधातील गुन्ह्याची कलमे

भास्कर जाधव यांच्यावर पोलिसांनी भादंवि कलम १५३ अ, ५०५/१, ५०५/२, ५००, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात योगेश अरुण शिंगटे (रा.निगडी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शिवसेना पक्षाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या भाषणात केले होते. हा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com