'विरोधकांवर कारवाईसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटत असाल तर...'

'विरोधकांवर कारवाईसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटत असाल तर...'

राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमोल धर्माधिकारी | पुणे : भाजप नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी साखर आयुक्तांसह बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची बाजू घेतल्यानंतर जर उच्चस्तरीय समिती लावली जात असेल तर मी कोरोना, लम्पी, दुष्काळ, अतिवृष्टी या काळात काम केलेले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी उच्चस्तरीय चौकशी लावावी. लोकांची मदत केली म्हणून कारवाई होणार असेल तर बिनधास्त करावी. स्वतःचे सरकार आले आहे म्हणून विरोधकांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटत असाल तर जाताना शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्नही मांडा. पण, त्यांना ते जमणार नाही. कारण त्यांची ती प्रवृत्ती नाही, असा टोलाही त्यांनी राम शिंदे यांना लगावला आहे.

शिवसेनेनंतर पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा विधान रोहित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आज तोडतोडीच राजकारण सुरू आहे. ते लोकांना आवडत नाही. एक मोठा पक्ष शिवसेना फुटताना आपण पाहिले आहे. एक मोठा पक्ष फुटल्यानंतर दुसरा मोठा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी आहे. त्यामुळे विरोधात असणारे ताकदवान पक्ष राष्ट्रवादीकडे पाहतील अस माझं होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याच्या प्रयत्नाप्रकरणी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. भास्कर जाधव हे सरकारच्या विरोधात बोलत असतील. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला असेल तर ते योग्य नाही. कोणी आमदार बंदूक घेतो हवेत गोळ्या झाडतो. एखादा आमदार बोलतो म्हणून त्याच्या घरावर हल्ला होतो हे बघावं लागत याची खंत आहे. लोकच आता याला उत्तर देतील, असेही रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com