2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही, ते सूर्याचे मालक नाहीत; सामनातून हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अविश्वास ठरवावर भाषण केलं. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी 90 टक्के ‘INDIA’ आघाडीवर बोलले. यावर विरोधकांनी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनातून म्हटले आहे की, मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले. ‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले. दोनेक तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. काँग्रेसकडे एकच प्रॉडक्ट आहे. तेच प्रॉडक्ट ते पुनः पुन्हा लाँच करतात व दरवेळी फेल होतात. मोदी म्हणतात ते एकवेळ खरे मानले तर ते काँग्रेस व गांधींना इतके का घाबरतात? भाजपमध्ये मोदीनाम व दंगलीशिवाय दुसरे एखादे प्रॉडक्ट असेल तर त्यांनी ते बाजारात आणावे. या प्रॉडक्टची ‘एक्सपायरी डेट’ 2024 पर्यंत आहे व त्यानंतर भारताचा राजकीय बाजार पूर्णपणे बदललेला असेल. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच अविश्वास ठरावाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत जे लांबलचक भाषण केले त्यात अहंकार, न्यूनगंड, चिडाचिड जास्त होती. मणिपूरवर ते फक्त तीन मिनिटे बोलले. मणिपूरवर त्यांचे भाष्य त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केले असते तर ‘इंडिया’ पक्षाला अविश्वास ठराव आणावा लागला नसता व मोदींना या वयात 2 तास 13 मिनिटांची चिडचिड करावी लागली नसतीमोदींनी त्यांच्या भाषणाने काँग्रेसला मोठे केले. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे त्यांच्या भाषणाने नक्की केले. ते सूर्याचे मालक नाहीत! असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.