तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा; सामनातून हल्लाबोल
ठाकरे गटाच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळविले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की, ‘भारताने ऐतिहासिक यश मिळविले आहे. मात्र आता तेवढ्याने समाधान होणार नाही. आता सूर्य-शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल.’ पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. चंद्रानंतर देशाला त्यांनी शुक्रावर, सूर्यावर कदाचित धूमकेतूवरही उतरवून संशोधन करायचे ठरविले आहे. पंतप्रधानांचे लक्ष्य सूर्यावर उतरण्याचे आहे, पण देशातील १४० कोटी जनतेचे लक्ष्य महागाई, बेरोजगारी आहे. अनेकांचे लक्ष्य कांद्याच्या वांध्यावर आहे. चंद्रावर, सूर्यावर यान उतरल्याने या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गती मिळणार असेल तर आनंदी आनंदच आहे. १९६२ पासून भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम नवनवीन भरारी घेत आहे.
तसेच मोदी सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करून कांदा उत्पादकांचा वांधाच करून ठेवला आहे. त्यासाठी कारण दिले आहे ते, कांद्याचे दर वाढतील आणि सामान्य माणसाची होरपळ आणखी वाढेल हे. शेतकरी आणि सामान्य जनता यापैकी कोणालाही झळ पोहोचणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागते हे खरेच, परंतु प्रत्येक वेळी या धोरणाचा फटका बळीराजालाच सहन करावा लागतो त्याचे काय? कांद्याचे निर्यात शुल्क वाढविण्यामुळे हेच झाले आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा लाव्हा उसळून वर आला आहे.
राज्यकर्ते मात्र गुरुवारी शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत. ‘मिशन सन’, ‘मिशन शुक्र’ अशा नवनवीन स्वप्नांच्या भुलभुलैयात जनतेला गुंतवीत आहेत. ‘मिशन सन’ वगैरे ठीक आहे, पण सध्या भरकटलेले कांद्याचे ‘यान’देखील नीट ‘लॅण्ड’ होणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा. नाहीतर २०२४ मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही. असे सामनातून म्हटले आहे.