'डिवचल तर आम्हीही अंगावर येऊ शकतो, माझ्या डोक्यात भरपूर'

'डिवचल तर आम्हीही अंगावर येऊ शकतो, माझ्या डोक्यात भरपूर'

संभाजीराजेंची शिवसेनेवर टीकास्त्र

तुळजापूर : खासदारकीबाबत शब्द फिरवला, असा थेट आरोप छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी शिवसेनेवर केला आहे. आम्हाला डिवचल तर आम्हीही अंगावर येऊ शकतो. माझ्या डोक्यात भरपूर आहे. टप्प्याटप्प्याने बाहेर काढू, असेही त्यांनी म्हंटले आहे. स्वराज्य संघटनेचा लोगो आज तुळजापुर येथे अनावरण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. तेव्हा मी माझ्या समाजाला बाहेर पडून समजवून सांगितले. माझा लढा सर्वच समाजासाठी आहे. आरक्षण टिकणार तर द्या अस सांगितल होते. मराठा आरक्षणासाठी मी चार दिवस अन्न खाल्ले नव्हते. हे सर्व मी सामान्य जनतेसाठी करत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मला माहिती नाही उदया काय होणार प्रस्थापितांविरोधात कशी लढत द्यावी लागेल. मात्र, मी तुमचा आवाज उठवणार, असा निर्धार त्यांनी केला आहे.

मी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेणार नाही. खासदारकी बाबत शब्द फिरवला, असा थेट आरोप संभाजी राजेंनी शिवसेनेवर केला आहे. छत्रपती घराण्याची काय ताकद आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. माझ्यासाठी तो विषय आता बंद झाला आहे. त्याची चर्चा देखील करायची गरज नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

आमच्याकडे बॅगा भरून देखील पैसा नाही. लोकांना आणण्यासाठी देखील पैसे नाही तरीही महाराष्ट्रभरातून लोक इथ आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी विस्थापित लोकांना ताकद दिली. मी माझ्या राजवाड्यात देखील राहत नाही. हीच स्वराज्यची ताकद आहे. जो चुकला तिथ मी समोर असेल. आम्हाला डिवचल तर आम्हीही अंगावर येऊ शकतो. माझ्या डोक्यात भरपूर आहे. टप्प्याटप्प्याने बाहेर काढू. आम्हाला डिवचल तर स्वराज्य पक्ष सुध्दा होवू शकतो, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

स्वराज्य संघटनेद्वारे विस्थापित लोकांना ताकद देणार आहे. स्वराज्य संघटना कोणत्याही पक्षात जाणार नाही. परंतु, वेळ आली तर मार्ग मोकळा आहे, असेही त्यांनी सांगितले. सामान्य लोकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

या वर्षभरात संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून महाराष्ट्रातील सर्वत्र शाखा स्थापन करणार आहेत. स्वराज्याचा प्रमुख अजेंडा म्हणजे गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे. स्वराज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र पुन्हा एकदा छञपती शिवाजी महाराजांचा मावळा तयार करायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात आले पाहिजे. शिवशाहुंचा विचार हाच राष्ट्राचा विकास, हे ब्रीद घेऊन पुढे जायचयं, असेही संभाजीराजेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com