शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीसांबरोबर ‘लव्ह जिहाद’ केला; राऊतांचे टीकास्त्र

शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीसांबरोबर ‘लव्ह जिहाद’ केला; राऊतांचे टीकास्त्र

संजय राऊत यांची शिंदे-फडणवीसांवर घणाघाती टीका

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून सध्या राजकारण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून शिंदे-फडणवीसांवर घणाघात केला आहे. महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीसांबरोबर ‘लव्ह जिहाद’ केला; राऊतांचे टीकास्त्र
पुण्यात खासगी बसला भीषण अपघात; 12 प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे सरकारही पंतप्रधान मोदींप्रमाणे बेकायदेशीर पद्धतीनेच राजशकट चालवीत आहेत. शिवसेनेच्या शाखांत पोलीस घुसवून शिंदे गटाचे लोक ताबा मिळवत आहेत. पैसा व पोलिसी बळाचा वापर करून कार्यालयांवर ताबा मिळवाल, पण जनभावना कशी विकत घेणार, हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. त्या नाजूक चुंबनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हे चुंबनाचे जिवंत दृश्य समाजमाध्यमांतून लगेच जगभर पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हे चुंबन प्रकरण घडले. आता या चुंबन प्रकरणात शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून अटका झाल्या.

सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट समाज माध्यमातून क्षणात पसरते व त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार? मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा. चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी. महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे, असा निशाणा संजय राऊतांनी साधला आहे.

देशात भीतीचे वातावरण आहे. माणसाचे शोषण हे भीतीच्या माध्यमातून केले जाते. आज गुडघे टेकण्याची स्पर्धा त्याच भयातून सुरू आहे. भारतीय जनता पक्षात सामील व्हा, गप्प बसा, नाहीतर तुरुंगात जा, असे सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांवर अशीच भीतीची तलवार टेकवली व त्यांना शरण आणले हे आता लपून राहिलेले नाही. मोदी-शहांचे राजकीय यश हे त्यांनी निर्माण केलेल्या भीतीत आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com