शरद पवार राजीनामा मागे घेणार? केलं सूचक विधान, तुमच्या मनासारखा...

शरद पवार राजीनामा मागे घेणार? केलं सूचक विधान, तुमच्या मनासारखा...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले असून वाय बी चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवर उपोषण सुरु केले होते.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले असून वाय बी चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवर उपोषण सुरु केले होते. तर, अनेक कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून शरद पवारांना राजीनामा मागे घेण्यास विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. बैठकीमध्ये तुमच्या मनासारखा निर्णय होईल, अशी घोषणा शरद पवारांनी केली आहे. शरद पवारांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

तुम्हाला विचारात घेऊन निर्णय घेणं गरजेचं होतं. परंतु, तुम्हाला विचारत न घेता मी निर्णय घेतला ही माझी चूक होती. परंतु, मी पक्षाच्या भवितव्याचा विचार करूनच अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. तरी तुमच्या भावनांचा आदर करुन यावर उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये तुमच्या मनासारखा निर्णय होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी आश्वस्त केले आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला असून घोषणाबाजी केली. पवार साहेबांनी आमच्या भावनांचा आदर केला आहे. त्यामुळे आम्ही सर्व जण उद्यापर्यंत वाट पाहत आहोत. आम्ही पवार साहेबांकडे केलेला हट्ट वाया गेला नाही. आम्हा सर्व तरुण कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे, अशा भावना महेबूब शेख यांनी व्यक्त केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com