सभा शरद पवारांची, मात्र चर्चा अजित पवारांची...! नेमकं कारण काय?
बीड : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. याविरोधात राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवार आता मैदानात उतरणार आहे. शरद पवारांची लवकरच बीडमध्ये जाहिर सभा होणार आहे. या सभेचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र, सभा शरद पवारांची असली तरी चर्चा अजित पवारांची रंगलेली पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये 17 तारखेला शरद पवार यांची सभा आहे. त्यानिमित्त आमदार संदीप क्षीरसागर यांनी शहरात बॅनरबाजी केली आहे. मात्र, आज अचानक अजित पवार यांच्या समर्थनात बॅनर शहरात लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, कामाचा माणूस आपला माणूस, शिवाय आम्ही बीडकर सदैव दादांसोबत अशा आशयाचे बॅनर शहरात लागले आहे. हे बॅनर आता जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवारांची नुकतीच पुण्यात गुप्त भेट झाली होती. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर अजित पवार आणि शरद पवारांनी कौटुंबिक भेट असल्याचे म्हंटले आहे. परंतु, चर्चा काही थांबायचे नाव घेत नाहीयेत. यामुळे आता शरद पवारांच्या बीडमधील सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.