भाजपच्या 'घमेंडीया' शब्दाचा शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, हुकूमत हातात आल्यावर...
मुंबई : मोदी सरकारविरोधात ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली आहे. या बैठकीवर सत्ताधाऱ्यांनी घमेंडीया म्हणत जोरदार टीका केली होती. या टीकेचा समाचार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून घेतला आहे. लोक एकत्र आल्यावर त्यांनी एकत्र येऊ नये असे म्हणणाऱ्यांना घमेंडीया म्हणाले पाहिजे, असा घणाघात शरद पवारांनी भाजपवर केला आहे.
शरद पवार म्हणाले की, आज आम्ही 28 राजकीय पक्षाचे नेता एकत्र आलो आहेत. याची जबाबदारी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी घेतली होती. पुढील लाईन तयार करण्यासाठी चर्चा झाली. तसेच, आज वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. भारताची सत्ता ज्यांच्या हातात दिली त्यांच्याबद्दल नाराजी वाढत आहे. हुकूमत हातात आल्यावर जे अधिकार हातात आले याचे परिणाम त्यांच्या निर्णयात झाला.
राजकारणात राजकीय पक्ष एकत्र येऊन काम करतात. मिटींग घ्यायचे ठरले पण तरी त्यावर भाजपने टीका केली. पण, आम्ही भेटलो यावर देखील त्यांनी टीका केली. भाजपचे वरिष्ठ नेता घमेंडीया असं बोलतात. पण, लोक एकत्र आल्यावर त्यांनी एकत्र येऊ नये असे म्हणणाऱ्यांना घमेंडीया म्हणाले पाहिजे, असा पलटवार त्यांनी केला आहे.
आता आम्ही थांबणार नाही. ज्या समस्या येतील त्याला आम्ही खांद्याला खांदा लावून मार्ग काढू. आणि एक चांगले प्रशासन देऊ, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.