...तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात असते; शरद पवारांचे प्रत्युत्तर
मुंबई : छगन भुजबळ यांनी तब्बल 20 वर्षानंतर तेलगी प्रकरणावर भाष्य केले. त्या प्रकरणात माझा राजीनामा का घेतला? असा सवालच भुजबळांनी शरद पवारांना केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भुजबळांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि निरीक्षक यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत शरद पवारांनी छगल भुजबळ यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते, असे शरद पवारांनी म्हंटले आहे. पण, टीका करणाऱ्यांना कोण समजवणार, असं देखील शरद पवार म्हणाले. तसेच, संभ्रम ठेवू नका लढायला लागा, अशा देखील सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
बीडमधील सभेत छगन भुजबळ म्हणाले की, तेलगी प्रकरणात मी त्याला अटक केलं. त्याच्यावर मोक्का लावायला सांगितला. कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले. साहेब तुम्ही बोलावलंत आणि सांगितलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या. साहेब, तुमच्यावरसुद्धा आरोप झाले होते. पण, तुमचा राजीनामा कुणी मागितला नाही आणि तुम्हीही तो दिला नाही. पण छगन भुजबळचा राजीनामा तुम्ही का घेतला, असा सवाल त्यांनी विचारला होता.