शिंदे गटाचा गोंधळ; एक, दोन नव्हेतर तब्बल सहा चिन्हे निवडणूक आयोगासमोर सादर

शिंदे गटाचा गोंधळ; एक, दोन नव्हेतर तब्बल सहा चिन्हे निवडणूक आयोगासमोर सादर

शिंदे गटाला नाव मिळाले असले तरी अद्यापही चिन्ह मिळालेले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाला आजच निवडणूक आयोगाकडे पर्याय द्यावे लागणार आहे.

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर ठाकरे गटाला नवे नाव व चिन्ह मिळाले. परंतु, शिंदे गटाला नाव मिळाले असले तरी अद्यापही चिन्ह मिळालेले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाला आजच निवडणूक आयोगाकडे पर्याय द्यावे लागणार आहे. यानुसार शिंदे गटाकडून ई-मेलद्वारे तीन पर्यायी चिन्ह पाठवले आहे. परंतु, शिंदे गट चिन्हांबाबत गोंधळलेला दिसून येत असून निवडणूक आयोगाला दोन ई-मेल पाठवले आहेत. या दोन्ही ई-मेलमध्ये वेगवेगळ्या चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे शिंदे गटाचे नेमके काय सुरु आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं सोमवारी निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेत ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असे नाव व मशालीचे चिन्ह दिले. तर, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाला मंजुरी दिली. परंतु, शिंदे गटाची तिन्ही चिन्ह आयोगाने नाकारली. यानंतर आज नव्याने शिंदे गटाने तीन चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत.

परंतु, शिंदे गटाने ई-मेल निवडणूक आयोगाला पाठविले असून दोन्हीमध्ये वेगवेगळ्या चिन्हांचे पर्याय देण्यात आले आहे. पहिल्या ई-मेलमध्ये रिक्षा, तुतारी आणि शंख असे तीन पर्याय शिंदे गटाने दिले आहेत. तर, दुसऱ्या ई-मेलमध्ये सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह सादर करण्यात आली आहेत. यातील आता कोणते चिन्ह शिंदे गटाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने उगवता सुर्य, त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com