महाशक्तीच्या पादुका महाराष्ट्राच्या सिंहासनावर ठेवून त्यांचे राज्य सुरू; शिवसेनेचे टीकास्त्र

महाशक्तीच्या पादुका महाराष्ट्राच्या सिंहासनावर ठेवून त्यांचे राज्य सुरू; शिवसेनेचे टीकास्त्र

भरत गोगावलेंना सरन्यायाधीशांची उपमा देत शिवेसेनेची शिंदे गटावर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांचा वाद आता अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच हे प्रकरण आता घटनापीठाकडे गेले असून आता अजून 4-5 वर्ष चालेल. यादरम्यान दुसरी निवडणुक जिंकून पुन्हा सत्तेत येऊ, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी केले होते. तसेच, शिवसेनेचे चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. यावरुन शिवसेनेनेही आज सामना संपादकीयमधून भरत गोगावले यांना सरन्यायाधीशांची उपमा देत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

स्वयंघोषित ‘सरन्यायाधीश’ गोगावले यांच्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्रातील बेकायदा सरकारच्या सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाला अधिक जागरूक राहावे लागेल. कारण महाराष्ट्राच्या भवितव्यासंदर्भातला न्याय, सुनावणी जणू आधीच झाली आहे व तसे निकालपत्र फुटीर गटाच्या हाती आहे अशा पद्धतीने त्यांचे लोक उघडपणे बोलत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आता तरी महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यात एक बेकायदेशीर सरकार चालणार नाही याचा निवाडा करावा.

सर्वकाही तुमच्या मनाप्रमाणे होईल, तुम्ही सांगाल तसे करू ही वचने दिल्यावरच बंडखोर आमदार फुटले. आता तर हे बेइमान लोक शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची भाषा करू लागले. 56 वर्षांची महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मोडून हे ‘खोके हराम’ आमचीच शिवसेना खरी असे सांगून शिवसेनाप्रमुखांची परंपरा मोडू पाहत आहेत व त्याकामी त्यांना महाशक्ती सहकार्य करीत आहे, असा आरोप शिवसेनेने अप्रत्यक्ष भाजपने केला आहे.

‘‘दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील,’’ असे बोलताना त्यांच्या जिभा झडल्या कशा नाहीत? शिवसेनेबाबत वाद निर्माण करायचे, बेडकांना भगवा रंग चोळून त्यांना बैलासारखे फुगवायचे; पण शेवटी बैल काय आणि बेडूक काय अति ताणले की तुटणार आणि फुटणारच! सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आमच्याच खिशात आहे म्हणून आम्हीच जिंकू, असे बोलणारे उद्या जनतेच्या रोषात उडून जातील.

दिल्लीची महाशक्ती आणि खोक्यांवर तुमचे सरकार आलेही असेल, पण न्यायालयात असे काही चालते, या भ्रमातून राज्यातील बेकायदा सरकार लवकरच बाहेर पडेल. आजही सर्वोच्च न्यायालयात रामशास्त्री बसले आहेत हे येथील खोके हरामांनी लक्षात ठेवावे. बंडखोर गटातील ‘भरता’चे आभार मानावे तेवढे थोडेच. दिल्लीतील महाशक्तीच्या पादुका महाराष्ट्राच्या सिंहासनावर ठेवून त्यांचे राज्य सुरू आहे. यालाच म्हणतात स्वाभिमानाची ऐशी की तैशी, अशीही टीका शिवसेनेने शिंदे गटावर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com