मोर्चात आडवे याल तर याद राखा; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

मोर्चात आडवे याल तर याद राखा; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. अशातच शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. आज सकाळी ९. ३० वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून या मोर्चाला सुरवात होईल. अशातच शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राची जनता वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिंमतीने महामोर्चात सामील होईल. महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर बसवले गेले आहे. हे सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे आहेत. हे धिंडवडे रोखण्यासाठीच तमाम महाराष्ट्रप्रेमींचा एक अति विराट मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे. या मोर्चामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचे हातपाय लटपटू लागले आहेत. म्हणूनच महाराष्ट्रप्रेमींचा महामोर्चा निघूच नये यासाठी परवानगी नाकारण्यापासून ते अटी-शर्ती लादून अडथळे निर्माण करण्यापर्यंत या लोकांचे रडीचे डाव सुरू आहेत. तरीही अडथळे ठोकरून महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा निघणार म्हणजे निघणारच. आजचा मोर्चा म्हणजे 11 कोटी मऱ्हाठी जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांतून लोक मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान किती प्रखर आहे हे दाखवून देतील. महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा का निघत आहे, हे राज्यातील बेकायदा-बेइमान सरकारने समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्राला दिल्लीश्वरांच्या पायाशी गहाण टाकण्याच्या कारवाया उघडपणे सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणे बनवणाऱ्या महाशक्तीविरोधातील लढाईचे हे रणशिंग आहे.

महाराष्ट्रप्रेमी लाखोंच्या संख्येने आजच्या मोर्चात धडकणार आहेत. राज्यपाल पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या राजभवनात बसून छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करते व मिंधे सरकार त्या अपमानाचे समर्थन करते. शिवरायांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्राची मर्द जनता पेटून उठली असताना त्या जनतेस गप्प बसवण्यासाठी दडपशाहीचा मार्ग अवलंबला जातोय. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महान दैवतांचा अपमान होत असताना मऱ्हाठी जनता गप्प बसेल काय? छे, छे! ही जनता शिवराय, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयजयकाराच्या बुलंद घोषणा देत महामोर्चात सामील होईल. शिवरायांचा महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही हे दाखविणारा आजचा महामोर्चा आहे, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

बाजूच्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी तर महाराष्ट्राच्या मिंधे सरकारची साफ शेळी-मेंढीच करून टाकली आहे. बेळगावातील मऱ्हाठी जनतेवर अन्यायाचा नवा वरवंटा फिरवला. वातावरण तप्त झाले तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून फक्त 15 मिनिटे चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमा भागातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवायची असे ठरले. त्याने काय घडणार? काही झाले तरी कर्नाटकचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार. कारण महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे बेकायदा सरकार सत्तेवर बसले आहे व ते दिल्लीचे गुलाम आहे.

महाराष्ट्राच्या जनतेलाही दिल्लीचे गुलाम बनविण्याचा त्यांचा इरादा आहे. महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी त्यांना खोकेच अर्पण करायचे आहेत. त्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा दैवतांचे अपमान सहन केले जात आहेत, पण महाराष्ट्राची जनता अपमान सहन करणार नाही. ती वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिंमतीने महामोर्चात सामील होईल. महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा, असा इशाराच शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com