सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे; शिवेंद्रराजेंचे टीकास्त्र

सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे; शिवेंद्रराजेंचे टीकास्त्र

शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा पराभव करत 18-0 ने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला आहे.

प्रशांत जगताप | सातारा : संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा पराभव करत 18-0 ने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला आहे.

यावेळी सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे, असं सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

नुसतं घराण्याचं नाव आणि घराण्याच्या नावावर मत मिळवण्याचे दिवस उदयनराजे यांचे संपले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत राहणं ही उदयनराजेंनी पद्धत बंद करावी. उदयनराजेंनी सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावं, असे आव्हान शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना दिलं आहे. ही निवडणूक उदयनराजेंनी शेतकरी संघटनेचा मुखवटा घालून लढवली होती. सातारा विधानसभा, कोरेगाव आणि कराड येथे उदयनराजेंची काय ताकद राहिली आहे? हे या निकालातून दिसून येत आहे.

भाऊसाहेब महाराजांवर लोकांचा विश्वास असून आम्ही गावोगावी केलेली विकासाची कामे पाहून लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. मार्केट यार्डमधील जमिनीबाबत उदयनराजेंनी केलेला डाव आम्ही हाणून पाडलाय. मार्केट कमिटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न उदयनराजे करत होते. त्याला आम्ही टोकाचा विरोध केला. उदयनराजेंची ताकद पहिल्या दिवसापासून नव्हती म्हणून स्वतः पुढे न येता शेतकरी संघटनेला उदयनराजेंनी पुढे केलं. राजू शेट्टींनी त्यांची संघटना उदयनराजेंच्या दावणीला बांधण्याचं काम केलं आहे. राजू शेट्टी यांनी तोडपाणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा. लोकांचा स्वाभिमानी संघटनेवर विश्वास राहील असे पदाधिकारी राजू शेट्टींनी तयार करावेत, असे सांगत राजू शेट्टी यांच्यावर देखील टीकास्त्र डागले आहे.

उदयनराजेंनी माझा गुणी बाळ म्हणून उल्लेख केला होता. मात्र, या बाळाचे गुण लोकांना पटतात का नाही? हे या निकालातून दिसत आहे. ही विजयाची सुरुवात आहे. उदयनराजेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपालिकेतून वेगळा होण्याचा निर्णय घेत मनोमिलन तोडलं. तिथून पुढे उदयनराजेंना यश मिळालेलं नाही त्यांच्या हातून लोकसभा गेली. आजच्या निकालातून उदयनराजेंच्या गटाला लोकांनी नाकारला आहे. हे सरळ सरळ दिसत आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाला देखील हे दिसत असून याचा विचार पक्ष देखील करेल.

उदयनराजेंनी नगरपालिकेमध्ये भरपूर कमिशन आणि पैसे खाल्लं आहे. पराभव झाला की उदयनराजे नेहमीच अज्ञातवासात जातात. ते आता चार-पाच दिवसानंतर पुन्हा उगवतील आणि अधिकाऱ्यांसोबत फोटो काढतील. आता रात्रीची जोरजोरात गाणी सुरू होतील ही उदयनराजेंची पोलिसांप्रमाणे मोडस ऑपरेटी आहे. मी सांगण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे पक्ष नेतृत्व योग्य वेळी उदयनराजेंच्या बाबतीत निर्णय घेतील, असे म्हणत खासदार उदयनराजेंवर शिवेंद्रराजेंनी सडकून टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com