'फक्त तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले'

'फक्त तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले'

शिवसेनेची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका

मुंबई : दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यावरुन शिवसेना-शिंदे गटात सामना रंगला होता.शिंदे गटाला बीकेसीच्या मैदानाची परवानगी मिळाली. परंतु, पालिकेने शिवसेनेला सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजी पार्कची परवानगी नाकारली होती. अखेर शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने याचा निकाल लावत शिवाजी पार्क शिवसेनेच्या पारड्यात टाकले. आणि शिवसैनिकांनी राज्यभरात एकच जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना अग्रलेखामधून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस व त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, 40 बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाठीत खुपसलेले खंजीर पचवले व ते पुढे गेले. त्याच मार्गाने आम्ही पुढे जात आहोत. इतिहासात तोतयांचे बंड म्हणून एक प्रकरण आहे. त्याचा अभ्यास या मंडळींनी केला पाहिजे. आम्ही कोणत्याही युद्धास तयार आहोत. समोरून या नाहीतर पाठीमागून वार करा. तुमचा प्रत्येक घाव शिवसेनेला, महाराष्ट्राला नवे बळ देणार आहे. चाळीस बेइमानांची शिवसेना म्हणे खरी, त्या बेइमानांच्या शिवसेनेशी कमळाबाईची युती आहे, असे शंभरदा रेटून बोलल्याने महाराष्ट्राची जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, असे वाटत असेल तर तो भ्रम आहे. काय तर म्हणे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार आणि त्यांनाच तो अधिकार आहे. या दळभद्री प्रकाराबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने फक्त तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले, असा घणाघात शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारावर केला आहे.

दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परंपरा शिवसेनेचीच आहे. फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधडय़ा भिजवत होते तेव्हापासून शिवसेनाप्रमुख शिवतीर्थावरून विचारांचे सोने विजयादशमीस उधळत आले आणि त्याच दिशेने महाराष्ट्र व देश पुढे गेला. त्या बाळासाहेबांनाच आव्हान देण्याइतपत बेइमानांची मजल गेली ती फक्त कमळाबाईच्या नादी लागल्याने. खऱ्या-अस्सल शिवसेनेचा नाद करायचा नाही व कमळाबाईच्या नादास जो लागला त्याचा कार्यभाग संपला हे जर मिंध्यांना कळत नसेल तर त्यांच्या बेइमान गटाने स्वतःच्या सर्वनाशाला आमंत्रण दिले आहे हे नक्की. दसरा मेळाव्याचे प्रकरण मस्तवाल, सूडवादी सत्ताधाऱ्यांमुळे उच्च न्यायालयात गेले, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू व्यवस्थित ऐकून घेतल्या व न्याय केला. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेचा दसरा मेळावा आता शिवतीर्थावरच वाजतगाजत, उत्साहाचा गुलाल उधळत होणार. शिवसेनेच्या परंपरेस साजेसा होणार. शिवसेनेच्या दुष्मनांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. संभ्रम निर्माण केला, पण आजपासून महाराष्ट्रात ज्या नवरात्रीचा जागर, आई दुर्गेचा उत्सव सुरू झाला आहे त्या जगदंबेचे आशीर्वादही शिवसेनेला लाभले आहेत. ज्याच्या पाठीशी देवदेवता, महाराष्ट्राची जनशक्ती, त्यांना कुणाचे भय? सत्य, न्याय आणि धर्म हाच महाराष्ट्राचा प्राण आहे. शिवसेना हा धर्म पाळत आली. मुंबई उच्च न्यायालयाने सत्य व न्यायाचा तराजू ढळू दिला नाही. शिवसेनाप्रमुखांचा पवित्र आत्मा त्या न्यायाच्या तराजूवर नक्कीच अभिमानाची फुले उधळत असेल. चला शिवतीर्थावर… तेथेच भेटू, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com