'मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो, 
अशी शिंदे गटाची अवस्था'

'मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो, अशी शिंदे गटाची अवस्था'

सामनातून शिंदेंना खोचक टोला

मुंबई : शिंदे सरकारला महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. यावरुन शिवसेनेने मुखपत्र सामाना संपादकीयमधून शिंदे सरकारला टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणी, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो. अशी शिंदे गटाची अवस्था, असा निशाणा शिवसेनेने सामनातून साधला आहे.

मुळात अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्याने व नीतीने खरी असती तर एव्हाना संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असता. शपथविधी नाही व शिंदे-फडणवीसांच्या फक्त दिल्ली वाऱ्याच सुरू आहेत. गुरुवारी तर उपमुख्यमंत्री फडणवीस एकटेच दिल्लीला गेले. इकडे मुख्यमंत्री शिंदे अचानक आजारी पडले. एकतर शिंदे यांना दिल्लीची हवा मानवत नाही किंवा महाराष्ट्राची हवा पुन्हा बिघडली असल्याने शिंदे यांना गुदमरल्यासारखे झाले असावे. लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात व दांपत्यास अनेक सल्ले देतात. शिंदे यांच्याबाबत तेच सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळय़ात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना शिंदे यांचेच डोके ठणकत राहील व एक दिवस त्यांना त्या डोक्यावरचे केस उपटत बसावे लागेल, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो, , अशा सदिच्छाही शिवसेनेने एकनाथ शिंदेंना दिल्या आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com