'योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो' भरसभेतून उदय सामंतांची कबुली
निसार शेख|खेड: : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची खेडमध्ये सभा झाली. त्यासभेत उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि भाजपावर जोरदार केली होती. त्यानंतर आज त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. याच सभेत बोलत असताना शिवसेना नेते आणि मंत्री उदय सांमत यांनी उध्दव ठाकरेंवर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले उदय सांमत?
सभेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, “योगेश कदमांना राजकीयदृष्ट्या कसं संपवायचं? हे षडयंत्र ज्या बैठकीत रचलं. त्या बैठकीला मीदेखील उपस्थित होतो. दापोलीच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटं द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त तिकिटं द्यायची, असा अघोषित नियम झाला होता. नंतर योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला.” असा गौप्यस्फोट केला.
पुढे उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना ते म्हणाले की, “पाच तारखेची सभा ही कॉर्नर सभा होती. ती विचार देणारी सभा नसून शिवीगाळ करणारी सभा होती. गेल्या ५० वर्षांत अनेक मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं. आठ महिन्यांपूर्वी शिंदेंनी आम्हाला गुवाहाटीला नेऊन आणलं. ते काही लोकांना इतकं वर्मी लागलंय, की अजून ते बाहेरच आले नाहीयेत” असा टोला उदय सामंतांनी लगावला.