Deepak Kesarkar
Deepak KesarkarTeam Lokshahi

पवारांनी लिहिलेले आणि आम्ही ठाकरेंबाबत मांडलेली भूमिका सारखीच, केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्यासह देशाच्या राजकारणात शरद पवारांचे स्थान मोठे आहे. ते विकासपुरूष आहेत या काही शंका नाही.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठे बंडखोरी झाली. त्यानंतर बाहेर पडलेल्या शिंदे गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विविध आरोप करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला जवळ केल्याने हिंदुत्वाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. त्या पुस्तकात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाचे आरोप ताजे झाले आहेत. आता यावरून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Deepak Kesarkar
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील गोंधळावर फडणवीसांची प्रतिक्रिया; हे सगळं स्क्रिप्टेड...

नक्की काय म्हणाले दीपक केसरकर?

अहमदनगर येथे माध्यमांशी बोलतांना केसरकर म्हणाले की, "एखादी ज्येष्ठ व्यक्ती आत्मचरित्र लिहिते त्यावेळी तिला ते सत्यतेने लिहावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून सुरु असलेल्या गोंधळामुळे पवारांच्या आत्मचरित्राकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात त्यांनी जे लिहिलेले आहे आणि आम्ही ठाकरेंबाबत मांडलेली भूमिका सारखीच आहे. उद्धव ठाकरे कुणालाही वेळ देत नव्हते. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली. शिवसेना खोक्यांमुळे फुटलेली नाही, हेच पवारांनी आदित्य ठाकरे यांनाही सांगितले आहे.दरम्यान, भाबड्या शिवसैनिकांनाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे वाटत आहे. त्यांनाही पवारांनी सामजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे." असे केसरकरांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, "राज्यासह देशाच्या राजकारणात शरद पवारांचे स्थान मोठे आहे. ते विकासपुरूष आहेत या काही शंका नाही. पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली पण ती फेटाळण्यात आली आहे. या दरम्यान त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान बळकट झाले आहे.ते कधी कुठली खेळी खेळतील याचा कुणालाही अंदाज येऊ शकत नाही. आता राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींमुळे त्यांचे स्वतःचे नाव बळकट केले आहे."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com