जयंती कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा; म्हणाले, त्या मोदींच्या लोकांनी...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे.परंतु, याच वादादरम्यान आता शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जयंती होत आहे. त्यामुळे शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. जयंतीदिनी या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यातच २३ जानेवारीला विधीमंडळात बाळासाहेब ठाकरे त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. मात्र, या कार्यक्रामाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान आता शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हा दिवस देशभरात साजरा केला जातो. हा एक प्रेरणा दिवस आहे. साहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्या दिवसाचे महत्त्व आणि शक्ती तशीच आहे. यानिमित्त उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ष्णंमुखानंद सभागृहात शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन करू, तसेच उद्या राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, हा राजकीय कार्यक्रम आहे. त्यावर न बोललं बरं. जे स्वत:ला मोदींचे लोक म्हणतात, त्या मोदींच्या लोकांनी राजकीय स्वार्थासाठी या कायक्रमाचे आयोजन केले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.