'ईडीचं अभिनंदन, राजकीय सूडबुद्धीचा डाग थोडा तरी धुतला गेला'

'ईडीचं अभिनंदन, राजकीय सूडबुद्धीचा डाग थोडा तरी धुतला गेला'

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा ईडीला अप्रत्यक्ष टोला

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)कार्यालयांवर छापेमारी केली आहे. देशभरात एनआयएने 95 ठिकाणी छापे टाकून 106 पीएफआय नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावर आज शिवसेनेने सामना संपादकीयमधून भाष्य केले आहे. ज्या महान कार्यासाठी ‘ईडी’ची निर्मिती झाली त्या कार्याच्या पूर्ततेसाठी ‘ईडी’ने प्रथमच दहशतवाद्यांवर धाडी टाकून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले दिसते, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर देशभरात ईडी आणि एनआयएचे छापे पडले व त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत. देशभरात दहशतवाद घडवून अराजक माजवण्याचा ‘पीएफआय’ या संघटनेचा कट होता व त्यासाठी मोठय़ा प्रमाणात ‘टेरर फंडिंग’ म्हणजे आर्थिक उलाढाल झाल्याचा दावा ईडी आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांकडून केला गेला आहे. हे खरे मानले तर सर्वप्रथम ‘ईडी’चे अभिनंदन करावे लागेल. कारण ज्या महान कार्यासाठी ‘ईडी’ची निर्मिती झाली त्या कार्याच्या पूर्ततेसाठी ‘ईडी’ने प्रथमच दहशतवाद्यांवर धाडी टाकून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले दिसते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने लगावला आहे.

आज केंद्रीय तपास यंत्रणा ज्या ‘पीएफआय’वर कारवाई करत आहेत, मोदींच्या हत्येचा जो कट उधळला आहे त्याचे श्रेय काँग्रेसने केरळात ‘पीएफआय’विरुद्ध केलेल्या कारवाईस द्यावे लागेल. अशा इस्लामी दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी हिंमत दाखवावी लागते. ‘पीएफआय’च्या खात्यांवर इतका पैसा आला कोठून व त्यांचे खरे आश्रयदाते कोण आहेत हे उकरून काढावे लागेल. त्यांना हिंदुस्थानचे इस्लामीकरण करायचे होते ते कोणत्या मार्गाने, यावरही प्रकाश टाकावा लागेल.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यासाठी, राजकारणासाठी ‘पीएफआय’चे प्रकरण तात्पुरते रंगवून व गाजवून सोडू नये. राष्ट्रीय सुरक्षेचा हा गंभीर विषय आहे. परंतु, ही कारवाई आणि त्यामागील कारणे खरी आहेत, की उद्याच्या निवडणुकांसाठी काही नवा डाव रचला जातोय ते पाहणे गरजेचे आहे. राज्यातील सरकारकडे ना काम ना दाम, त्यामुळे दंगे पेटवून निवडणुकांना सामोरे जायचे काम ते करू पाहत असतील तर महाराष्ट्रीय जनतेने सावध राहायला हवे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याप्रकरणी दंगल पेटवायचा त्यांचा इरादा होता. पण उच्च न्यायालयाने रामशास्त्रींची भूमिका घेतल्याने तो डाव उधळला गेला. आता ‘पीएफआय’प्रकरणातही तोंडाच्या वाफा दवडण्याऐवजी कृती करावी व महाराष्ट्राच्या भूमीतून ही विषवल्ली नष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेने सरकारकडे केली आहे.

एनआयएने तसेच ईडीने बऱयाच काळाने त्यांना नेमून दिलेले कायदेशीर काम केले व ते राष्ट्रहिताचे आहे. कपिल सिब्बल यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते की, ‘हिंदुस्थानात सध्या द्वेषाचे राजकारण केले जात आहे. विरोधी पक्षाचे नेते सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या दहशतीखाली जगतायत. देशातील बहुसंख्य लोक घाबरले असून ते मानसिकदृष्टय़ा खचले आहेत.’आता त्या ईडीसारख्या संस्थांवरील राजकीय सूडबुद्धीचा डाग ‘पीएफआय’वर हात टाकल्याने थोडा तरी धुतला गेला. पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट यानिमित्ताने उघड झाला. आम्ही त्यांना उदंड, निरोगी, सुरक्षित दीर्घायुष्य आई जगदंबाचरणी चिंतीत आहोत, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com