कुटुंबातील एकाचा बळी घेतल्याचा पेडणेकरांचा आरोप; सोमय्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

कुटुंबातील एकाचा बळी घेतल्याचा पेडणेकरांचा आरोप; सोमय्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे गंभीर आरोप केले.

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. अशातच किशोरी पेडणेकर यांच्या सासूचा मृत्यू झाला आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाले असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे. यावर आज किरीट सोमय्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

किरीट सोमय्या म्हणाले की, किशोरी पेडणेकर यांच्या दुःखात मी सहभागी आहे. पण, देश प्रथम असतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, एसआरएचे गाळे वर्षानुवर्षे ताब्यात घेतले म्हणून नोटीस दिली आहे. एक नोटीस गाळे धारक संजय अंधारी, दुसरी गंगाधर वडलकोंडा, तर तिसरी गंगाराम बोंगा यांना दिली होती. लाभार्थी असल्याने झोपडपट्टी वासियांना मोफत सदनिका दिली होती. परंतु, त्यांनी ही सदनिका किशोरी पेडणेकर यांना दिली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या तक्रारी दाबल्या होत्या. आता शिंदे-फडणवीस सरकारने एसआरएला चौकशीचे आदेश दिले आहेत. कुलूप घेउन नौटंकी करू नका, अशी टीकाही त्यांनी केली आहे,

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे एसआरएचा गाळा आहे. ही किश कॉर्पोरेट कंपनी पेडणेकर व त्यांच्या पतीच्या नावे आहे. वडलाकोंडा या गाळेधारकाला नोटीस पाठविण्यात आली आहे. वडलाकोंडा व्यक्ती कुठे आहे? हे पेडणेकर यांनाच माहिती आहे. संजय अंधारी असा कुणी व्यक्ती आहे का? त्याचाही गाळा तुम्ही घेतला, असा आरोपही सोमय्यांनी पेडणेकरांवर केला आहे.

संजय अंधारी याच्या नावे करारनामा आहे. परंतु, असा कुणी व्यक्तीच नसल्याचा सोमय्या यांनी दावा केला आहे. सुनील कदमला संजय अंधारी म्हणून दाखवले व झोपडपट्टी वासियांचे गाळे ताब्यात घेतले. हा फ्रॉड आहे. त्याची चौकशी सुरु झाली आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, किरीट सोमय्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. या बातम्या पाहून सासूबाईंच्या मनावर परिणाम होत होता. त्यांचं वय नक्कीच होतं. पण बातम्या त्या रोज पाहायच्या. सासरे जाऊन तीस वर्ष झाली आहेत. परंतु, बातम्या ऐकून त्या घाबरल्या, त्यांना त्रास सुरू झाला. माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला, असा थेट आरोपच त्यांनी केला आहे. याचं भांडवल करत नाही पण फॅक्ट सांगत आहे. किती बोलायचं ते बोला मी त्यांना उत्तर देणार नाही, कायद्याचं उत्तर कायद्याने देणार, असेही पेडणेकरांनी सांगितले होते.

काय आहे प्रकरण?

लोअर परळ येथील गोमाता जनता एसआरए कोऑपरेटिव्ह सोसायटीत किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केला आहे. पेडणेकर यांनी या जागेची कागदपत्रे आपल्या दिवंगत बंधू सुनील कदम यांच्या नावे केली आहेत असे किरीट सोमय्या म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com