शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण झाला भाजप पदाधिकारी; सुळेंचा फडणवीसांवर निशाणा
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भामरे हा भाजपचा पदाधिकारी झाला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशात, आता सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका गुन्हेगारी मानसिकतेच्या व्यक्तीला राजाश्रय दिला जातो ही अतिशय खेदाची आणि गंभीर बाब आहे, अशी खंतही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आदरणीय पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला भाजपाने सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली. देवेंद्रजी, तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, संसदेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिद्धांताबद्दल बोलले, आपण सिद्धा़तांचे पालन करताय का, असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. एका गुन्हेगारी मानसिकतेच्या व्यक्तीला राजाश्रय दिला जातो ही अतिशय खेदाची आणि गंभीर बाब आहे, अशी खंतही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील निखिल भामरे हा फार्मासिस्ट तरुणानं शरद पवारांविरोधात सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यालाच आता भाजपने पद दिल्याने राष्ट्रवादीमधून टीका करण्यात येत आहेत. तसेच, आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.