राम कदमांसारखे अंधश्रद्धेत अखंड बुडून गेलेले पामर जीव...; सुषमा अंधारेंचा घणाघात

भाजपा आमदार राम कदम यांनी कंबलवाले बाबांना बोलावून मतदारसंघातील लोकांवर उपचार केल्याची घटनी समोर आली आहे. यावर सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र डागले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपा आमदार राम कदम यांनी कंबलवाले बाबांना बोलावून मतदारसंघातील लोकांवर उपचार केल्याची घटनी समोर आली आहे. त्यावरुन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आमदार कंबल बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत राम कदम यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

सुषमा अंधारे म्हणाले की, एकीकडे आम्ही चंद्रावर घर बांधण्याच्या गप्पा करतोय. चांद्रयान यशस्वी झालंय. G-20चा निमित्ताने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे भक्तगण विश्वगुरूच्या स्पर्धेत आम्ही म्हणजेच आम्ही आहोत अशाही वल्गना करत आहेत. राम कदमांसारखे अंधश्रद्धेत अखंड बुडून गेलेले पामर जीव मात्र कंबल बाबाच्या नादाला लागून एक वेगळाच वैचारिक गोंधळ तयार करत आहेत.

महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला. श्रद्धा कोणाच्याही असाव्यात त्याला विरोध नाही. पण, लोकप्रतिनिधींनी जर असं कृत्य केलं तर गावखेड्यातील लोकांनी चुकीची कृती केली तर त्याला जबाबदार कोण? मला वाटतं लोकप्रतिनिधींनी लोकांना दिशा दाखवली पाहिजे. नेता हा ध्येनता असेल तर जनता जाणती कशी होईल, असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मतदारसंघातील विकलांग नागरिकांवर उपचार करण्यासाठी कंबल बाबा यांना बोलावल्याचे राम कदम यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या बाबांसमवेतचे व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यामध्ये, काही लोकांवर कंबल बाबांकडून उपचार केले जात असल्याचे दिसून येते. तर, लोकांना आवाहनही राम कदम यांनी केले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com