रामदास कदम शरीराने शिंदेंजवळ मात्र, मनाने ठाकरेंजवळच?
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण एकदम ढवळून निघाले आहे. अशातच शिवसेनेत सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले. शिवसेना नक्की कोणाची? हा वाद आता कोर्टाच्या दरबारी आहे. परंतु, शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार आरोप- प्रत्यारोप होत असताना आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, याचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना विसर पडल्याचे दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या काळातील एका मोहिमेचा असलेला फेसबुक प्रोफाईल अद्यापही चेंज केला नाहीय.
शिवसेनेत झालेल्या अंतर्गत वादामुळे बंडखोरी झाली आणि दोन गट या ठिकाणी शिवसेनेत पडले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर शिवसेना आणि बंडखोर आमदार यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध या ठिकाणी रंगताना दिसत आहे. शिवसेनेवर रामदास कदमांकडून सध्या जोरदार टीका करणं सुरु आहे.
मात्र, या टीकेदरम्यान ठाकरे सरकारच्या काळातील 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचा फेसबुक प्रोफाईल अद्यापही बदलेला नाहीय. रामदास कदम हे नेहमी समाज माध्यमांवर सक्रिय असतात. भाजपने त्यावेळी या मोहिमेवर जोरदार टीका केली होती. शिंदे गटातील आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या जवळपास सर्वच पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केल्या आहेत. परंतु, रामदास कदमांनी अद्यापही फेसबुक प्रोफाईल बदलला नाही. तसेच उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा होत आहे.

काय होती ही मोहीम?
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीमेचे मुख्य उद्दिष्ट कोरोनाबाधितांचा जलद शोध घेऊन त्यांना उपचाराच्या कक्षेत आणणे व त्यांच्यापासून कोरोनाचा संभाव्य प्रसार टाळणे होते. महाविकास आघाडी सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याकडे शासनाने विशेष लक्ष दिले होते.