मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा पोहचणार लाभार्थीच्या घरी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा पोहचणार लाभार्थीच्या घरी

राज्य शासनाने 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळाली.
Published by :
Dhanshree Shintre

राज्य शासनाने 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळाली. त्यामुळे या योजनेच्या लाभपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये व लाडक्या बहिणीला त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार असल्याचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज सांगितले.

अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शासकीय कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करून जागेवर अर्ज भरण्याची प्रक्रिया करतील. आता डोमिसाइल प्रमाणपत्राचा पर्याय म्हणून 15 वर्ष जुने रेशन कार्ड किंवा मतदान ओळख पत्र ही चालणार आहे. त्यामुळे महिलांनी कागदपत्र काढण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता भासणार नाही. नवीन निकषांनुसार कार्यवाही करण्यात येईल.

जिल्ह्यात किमान पन्नास कुटुंबांमध्ये एक शासकीय कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करेल. यामुळे जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. तरी महिलांनी कोणतीही घाई न करता घरोघरी लाभ देण्याच्या या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com