शिवसेनेसोबतच्या युतीवरुन संभाजी ब्रिगेडमध्येच दोन गट; 'या युतीला आमची संमती नाही'

शिवसेनेसोबतच्या युतीवरुन संभाजी ब्रिगेडमध्येच दोन गट; 'या युतीला आमची संमती नाही'

युतीवरून संभाजी ब्रिगेड राजकीय व संभाजी ब्रिगेड सामाजिकमध्ये मतांतर

मंगेश जोशी | जळगाव : शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा निर्णय घेतला. यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु, शिवसेनेसोबत युतीवरुन संभाजी ब्रिगेडमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना-संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय युतीला आमची संमती नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेड सामाजिकचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी घेतली आहे.

शिंदे-भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेनं संभाजी ब्रिगेड हातमिळवणी केली असून येथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, शिवसेनेसोबतच्या युतीवरुन संभाजी ब्रिगेडमध्येच दोन गट पडले आहेत. जळगावात पद्मालय विश्रामगृहावर आयोजित संभाजी ब्रिगेड सामाजिकच्या वतीने झालेल्या बैठकीत शिवसेना व संभाजी ब्रिगेड राजकीय यांच्या युती बाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीस आपली संमती नाही. मात्र, त्यांच्या युतीचे आम्ही स्वागत करतो. पण, देशाच्या हिताचे व कष्टकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जो पक्ष काम करेल. त्याच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड सामाजिक उभी असणार असल्याचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीनंतर संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय व संभाजी ब्रिगेड सामाजिक यांच्यात मतांतर पाहायला मिळत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच युती तयार झाली. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना हा निर्णय धक्कादायक आणि आश्चर्यकारक वाटला. तर भाजपने `विनाशकाले विपरित बुद्धी`, अशा शब्दात या युतीची खिल्ली उडवली. शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवरून आता भाजप विरुद्ध उद्धव सेना असा वाद रंगू लागला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com