जीवाभावाच्या सहकाऱ्याला मुकलो; शरद पवारांनी वाहिली विनायक मेटेंना श्रध्दांजली
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विनायक मेटे यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे. सामाजिक नेतृत्वाला, जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो, अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.
शरद पवारांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विनायक मेटे यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले की, दिवसाची सुरुवात विनायकराव मेटे यांच्या अतिशय धक्कादायक अशा अपघाती निधनाच्या बातमीने झाली. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता.
ते राजकीय कार्यकर्ते कमी पण सामाजिक कार्यकर्ते अधिक होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल किंवा नव्या पिढीच्या शैक्षणिक सवलतींचा प्रश्न असेल, अशा सगळ्या कामांमध्ये अत्यंत बारकाईने व अभ्यासूपणाने व्यक्त होणारे ते व्यक्तिमत्व होते. राज्य सरकार वा अन्य संस्था सुसंवाद ठेवण्याची त्यांची भूमिका होती. शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले व अनेकांना आपली आग्रही भूमिका पटवून देण्याची खबरदारी घेतली.
आजच्या आकस्मिक अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातल्या एका मोठ्या सामाजिक नेतृत्वाला आपण मुकलो. मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने या दुःखामध्ये सहभागी आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आमचे सहकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी काम केले. नंतर स्वतःचा पक्ष काढण्याची भूमिका त्यांनी घेतली. अशा एका जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही विनायक मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले.ही घटना अतिशय दुःखद आहे.हे दुःख सहन करण्याची शक्ती मेटे परिवाराला मिळावी ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे. तर, अजित पवार यांनी शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, असे म्हणत श्रद्धांजली वाहिली.