Congress : महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर संधी मिळणार का?
सुनील शेडोळकर
1960 च्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मोठ्या कालखंडासाठी काॅंग्रेस ची महाराष्ट्रात सत्ता राहिली आहे. अपवाद 1978 च्या पुलोद सरकारचा, 1995 व 2014 मधील युती सरकारची. एखादी टर्म हातून गेल्यावर पुन्हा नव्या त्वेषाने काॅंग्रेसने कमबॅक केल्याची निवडणुकीची आकडेवारी सांगते. पुलोद सरकारच्या निमित्ताने काॅंग्रेस पासून दुरावलेले शरद पवार यांनी आपला समाजवादी काॅंग्रेस पक्ष 1985 साली औरंगाबाद मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. 1999 मध्ये सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार काॅंग्रेस पासून दूर जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि लगेच काॅंग्रेस सोबत सत्तेत तब्बल दहा वर्षे राहिले. काॅंग्रेस ची विचारधारा महाराष्ट्रावर अनेक वर्षे राज्य करून गेली. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काॅंग्रेस शिवसेना - भाजपने काॅंग्रेसला घेरुन सत्ता मिळवली खरी सत्ता मिळाल्या वर भ्रष्टाचाराच्या बाबतीत काॅंग्रेस ला मागे टाकण्यासारखी परिस्थिती भारतीय जनता पक्ष व शिवसेना या समविचारी पक्षांनी निर्माण केली असल्याने मतदारांचा अपेक्षा भंग झाला आहे एवढे मात्र निश्चित. सत्तेसाठी वैचारिक मूल्यांना मूठमाती देण्याची नवी राजकीय परिस्थिती 2019 पासून महाराष्ट्र अनुभवतो आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात गेल्यावर जशी बिघडली तशीच गत भारतीय जनता पक्षाची देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाली आहे हे बिघडलेले वास्तव या दोन्ही पक्षांना मान्य करावेच लागेल. काॅंग्रेस मुक्त भारत ही नरेंद्र मोदींची कल्पना म्हणजे दुसऱ्याला संपवून राज्य करण्याची हा अघोरी प्रकार आहे.
मोदी एकट्या काॅंग्रेसला संपविण्याचा घाट घालत नसून सोबत येणाऱ्या मित्रपक्षांनाही नेस्तनाबूत करण्याचा हवरटपणा करत आहेत आणि फक्त आणि फक्त सत्तेची ऊब उपभोगण्यासाठी त्यांचा आणि भाजपचा अट्टाहास सुरू आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला डोक्यावर घेऊन सत्तेच्या राजमार्गापर्यत पोहोचवले त्याच बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा केवढा आटापिटा भारतीय जनता पक्षाला करावा लागला याचे काही सोयरसुतक आहे की नाही. उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती नक्कीच शिवसेनेला व्यवहारवादी बनविणारी राहिली आहे हे आता लपून राहिलेले नाही. ज्या बाळासाहेबांनी जात पात न पाहता सामान्य तरुणांना सत्तेची फळं चाखायला दिली त्याच आपल्या शिलेदारांकडून तिकिट वाटपात आर्थिक गणित आणण्याचे पातक उद्धव ठाकरे यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरेंना जाऊन 10 वर्षे झाल्यानंतरही ज्या पद्धतीने शिवसेना फुटली आणि जाताना प्रत्येकाने बाबासाहेबांचा फोटो सोबत न्यावा यापेक्षा मोठी पक्षनिष्ठा काय असू शकते? उद्धव ठाकरे हे त्या दृष्टीने कधी पाहणार आहेत की नाही. राजकारणातील पक्ष निष्ठा अलीकडच्या काळात झपाट्याने लोप पावत चालली असताना लोकसभेतील 100 पेक्षा जास्त खासदारांचे तिकिट कापून त्या ठिकाणी नवे उमेदवार उभे करुन त्यांना निवडून आणण्याची धमक नरेंद्र मोदींनी एकदा नव्हे तर दोन वेळा दाखवून दिली आणि 2024 साठी पुन्हा भलीमोठी यादी त्यांनी तयार ठेवत आपल्या पक्षाला एका शिस्तीत बांधण्याचा मोदी प्रयत्न करताहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चाळीस चाळीस आमदार फोडले पण आपल्या 106 पैकी एकही फुटला नाही. एकाधिकारशाही एकवटली की उन्मात्तपणा अंगात येतोच याची अनुभूती आधी इंदिरा गांधी व आता नरेंद्र मोदींच्या कारभाराकडे बघून येते तो भाग वेगळा. पण पैशांसाठीच सत्ता लागते हे काॅंग्रेसी तत्त्व शिवसेना आणि भाजप या दोघांनीही ते 2019 पासून दाखवून दिले आहे.
शिवसेना काॅंग्रेस सोबत जाण्याआधी मी शिवसेनेचे दुकान बंद करेल असे स्पष्टपणे बाळासाहेबांनी सांगूनही उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये केवळ आणि केवळ सत्तेसाठीच काॅंग्रेस सोबत गेले हे राजकारण न कळणारे महाराष्ट्रातील लहान पोरंही सांगेल. शरद पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असे त्यांच्यावर टीका करताना एकीकडे सांगायचे आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी त्याच शरद पवारांची टाळी स्वीकारायची हे 2014 ला आधी देवेंद्र फडणवीस यांनी व 2019 साली उद्धव ठाकरे यांनी केले. दोन्ही वेळा फक्त आणि फक्त सत्तेची भूक माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते याचेच विकृत दर्शन महाराष्ट्रातील जनतेला झाले हे मात्र खरे. ज्या काॅंग्रेस ला शिवसेना - भाजप ने भ्रष्टाचाराच्या नावाने यथेच्छ झोडपून 1995 ला व 2014 ला सत्ता मिळवली त्यातील किती काॅंग्रेस वाल्यांना या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी जेलमध्ये टाकले? त्यांचा किती काळा पैसा सरकार दरबारी जमा केला? त्यांच्या किती मालमत्ता जप्त केल्या?महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे आरोप केल्याने कलंकित झालेले मंत्री काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेत होते, आज फडणवीस यांच्या सोबत आहेत. काल फडणवीस या कारणांमुळे ठाकऱ्यांचे वाभाडे काढायचे आज ठाकरे फडणवीसांचे काढत आहेत. मग यापेक्षा काॅंग्रेस काय वाईट होती असा विचार मतदारांकडून पुढे येतो आहे .
काॅंग्रेस ची एक विचारसरणी नक्कीच आहे, काळाच्या ओघात व घराणेशाहीच्या ओंगळवाण्या पद्धतीने काॅंग्रेसला सत्तेचा दर्प चढला आणि 2014 ला नरेंद्र मोदी यांना त्यांनी आयती संधी दिली, त्याच संधीवर आरूढ होत देशात काॅंग्रेस च्या नायनाटीचा विडा उचलत थैमान घातले गेले. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या काॅंग्रेसला मोदी - शहा जोडीने धोबीपछाड देत असताना काॅंग्रेस ने प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका वठविण्यासाठी जमिनीवर उतरुन लढण्याची गरज असताना विरोधी पक्षात बसण्याची सवय नसल्याने मुद्दे भरकटावत काॅंग्रेसने नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण लोकांच्या भावनेला हात घालत मोदींनी 2019 ला मैदान तर मारले पण धाकदपटशा चा बागुलबुवा उभा करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी ईडी, सीबीआय, व इनकम टॅक्स यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढत आॅपरेशन कमळ फुलवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. कमळ फुलविलेले कर्नाटक नुकतेच हातचे गेले, मध्य प्रदेश जाण्याच्या स्थितीत आहे, राजस्थान मध्ये येण्याची शक्यता नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या काॅंग्रेसने 2024 ची सेमीफायनल समजून जर निवडणुकीत जिवाचे रान केले तर काॅंग्रेस चे अच्छे दिन पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यातही महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाकडून जे सत्तेचा विचका करण्यात आला त्यात भाजप स्वतः, शिवसेना ठाकरे व शिंदे दोन्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शरद पवार दोन्ही असे प्रमुख पक्ष कमालीचे बॅकफुटवर आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण व नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे उरलेल्या शिवसेने बरोबर काॅंग्रेस पुन्हा जाईल अशी शक्यता नाही. ज्या शरद पवारांमागे 2019 मध्ये काॅंग्रेस ला फरफटत जावे लागले व नाईलाजाने उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हावे लागले यापेक्षा काॅंग्रेससाठी वाईटात वाईट काय असू शकते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपापले पक्ष सांभाळतील का? या विवंचनेत असताना परिणाम शून्य ठरणाऱ्या इंडिया आघाडी च्या बैठकीत काॅंग्रेसला पुन्हा एकदा दंडबैठका मारण्याच्या कवायती करायला सांगत आहेत.
अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांचे पत्ते 1 सप्टेंबर रोजी उघड केले जाणार आहेत त्यातून महाराष्ट्रात तरी काॅंग्रेस वेळीच सावरली तर जनमत त्यांच्या साठी अनुकूल ठरु शकते. कारण शरद पवार काॅंग्रेस ला घेतल्याशिवाय इंडिया आघाडी ची मोट बांधू शकत नाहीत. बांधली जाणारी मोट काॅंग्रेस साठी कमी आणि स्वतः च्या अस्तित्वासाठी जास्त असणार आहे. इंडिया आघाडीतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पदासाठी नाव मागे पडणे हे काॅंग्रेस साठी शुभसंकेत ठरु शकते. महाराष्ट्रात नाना पटोले व विजय वडेट्टीवार या विदर्भाच्या शिलेदारांकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची सुभेदार आहे. बाकी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह किमान डझनभर राज्यपातळीवरील नेत्यांनी एकदिलाने उतरण्याचे ठरवले तर काॅंग्रेसच्या स्वबळाच्या इच्छेला अपेक्षांची फळबहार येऊ शकते. बघूया काॅंग्रेस कशा प्रकारे या वेळी बुद्धिबळाचा डाव अन् आपल्या सोंगट्या कशा प्रकारे सजवतात, कारण काॅंग्रेसला केवळ काॅंग्रेस च हरवू शकते या इतिहासातील ओळी जरी काॅंग्रेस ने आठवून मार्गक्रमण केले तर महाराष्ट्राचे भवितव्य अधिक स्पष्टपणे लोकांच्या गळी उतरवणे काॅंग्रेस ला सहज शक्य आहे. बघूया काय होते?