Dhairyasheel Rajsinh Mohite-Patil On Ajit Pawar : IPS अधिकारी प्रकरणात नवा ट्वीस्ट! "...तर बड्या नेत्याचा अजित पवारांना कॉन्फरन्स कॉल"; धैर्यशील मोहिते यांचा गौप्यस्फोट
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या महिला अधिकाऱ्याला दमबाजी प्रकरणात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एन्ट्री झाली आहे. "पक्षाच्या कार्यकर्त्याने नव्हे तर तालुक्यातील बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला होता". अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यावर तालुक्यातील बड्या नेत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
पण अंजना कृष्णा दबावाला घाबरत नाहीत म्हणाल्यावर त्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॉन्फरन्स कॉल लावला होता असा गौप्यस्फोट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कधी थेट फोन करत नाही. ते जिल्हाधिकारी किंव्हा पोलिस अधीक्षकांना फोन करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देतात.
कुर्डू मध्ये बीड पेक्षा भयाण परिस्थिती आहे. मुरूम उत्खनन करण्याची कुठलीही अधिकृत परवानगी नसल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. गावात मुरूम माफियांची दहशत आहे. तिथे मतदान देखील होऊ दिले नाही. मजुरीसाठी स्थलांतरित झालेल्या दलितांच्या शेतातील मुरुम दमबाजी करून उपसला जात असल्याचा आरोप यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय.