Maghi Ganeshotsav 2025: माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्तीच्या विसर्जनावर बंदी, उच्च न्यायालयाचे कडक आदेश

Maghi Ganeshotsav 2025: माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्तीच्या विसर्जनावर बंदी, उच्च न्यायालयाचे कडक आदेश

माघी गणेशोत्सव 2025 मध्ये पीओपी मूर्तींच्या विक्री आणि विसर्जनावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हे कठोर आदेश दिले आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

यंदा माघी गणेशोत्सव 1 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. असं असताना उच्च न्यायालयाने माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर काही नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. माघी गणेशेत्सवात पीओपीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची विक्री आणि विसर्जन न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. हे निर्णय गुरुवारी घेण्यात आले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पर्यावरणास हानीकारक असणाऱ्या पीओपी गणेशमूर्ती बनविणे, त्यांची विक्री करणे आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री झाली, तर त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश दिले.

तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य सरकार तसेच मुंबई महापालिका आणि इतर अन्य महापालिकांना दिले. खंडपीठाने उपरोक्त अंतरिम आदेश देताना उच्च न्यायालयाच्या 2022 सालच्या निर्णयाचाही हवाला दिला.

कोणाही व्यक्तीला पीओपीपासून मूर्ती तयार करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय मद्रास न्यायालयाने दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. या निर्णयाचा दाखलाही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने माघी गणेशोत्सवात पीओपी बंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देताना दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com