Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Rajkot : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने आणि पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा झाला, याचा आनंद आणि समाधान आहे. मागील काळात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्थापित करु, असा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच पुतळ्याचे आज पूजन केले," असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नारायण राणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दिपक केसरकर, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
"कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतात. या वादळांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करुन, त्यापेक्षाही अधिक इंटेन्सिटीचे वादळ आले तरी पुतळा उभा राहू शकेल, अशी रचना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशामधील बहुधा हा सर्वात उंच पुतळा असू शकेल. या पुतळ्याची उंची 60 फूट, तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट इतकी आहे. किमान 100 वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल इतकी मजबुती या पुतळ्याची आहे. पुतळा उभारणाऱ्यांकडेच त्याच्या देखभालीचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या परिसरातील उपलब्ध होणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करुन व्यवस्था उभ्या करण्यात येणार आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्वराज्याचा अनुभव यावा, येथील भव्यता पाहता यावी, अशाप्रकारे या परिसराचा विकास करण्यात येणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाद्वारे कोकणाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.