Electricity Bill : खुशखबर ! वीजदरात होणार मोठी कपात, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात होणार आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदरात कपातीचा प्रस्ताव महावितरणकडून सादर झाला आणि आयोगाने आगामी पाचही वर्षात वीजदर कमी करण्याचा आदेश दिला आहे.
आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यामध्ये वीज दरामध्ये कपात केली जाणार आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्या टप्प्याने वीज दरामध्ये 26 टक्के कपात केली जाणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी ज्यांचा वीज वापर असेल अशा लोकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स' वर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत".
नंतर त्यांनी लिहिले की, "साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील".