सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत - संजय राऊत
कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली.याच पार्श्वभूमीवर आता आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यावरुनच खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मधस्थी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत, सीमाभागाचे सर्वाधिक चटके त्यांची सासूरवाडी असलेल्या कोल्हापूरला बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष कोल्हापुरात होतो, त्यामुळे या प्रकरणात सर्वात जास्त माहिती त्यांना आहे. राऊत पुढे म्हणाले की, न्यायायलयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने सीमाभागात हस्तक्षेप करायचा नाही का?संसदेनं बोलायचं नाही का? न्यायालय राम मंदिराची सलग सुनावणी करून प्रश्न सोडवू शकतो, पण 20 ते 25 लाख मराठी भाषिकांच्या प्रश्नावर मात्र तारखेवर तारीख मिळत आहे. असे संजय राऊत म्हणाले.
तसेच अमित शाह यांना भेटून काही फायदा नाही, असे बोम्मई म्हणत आहेत, पण आम्ही म्हणतो, अमित शाहांना भेटून फायदा आहे. कारण सीमाभाग केंद्रशासित करण्याचा निर्णय झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय घेत असते. सीमाभागात धुडगूस सुरु असून त्याठिकाणी राज्यातील फौजफाटा काढून केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक आयोगाखाली येतो, त्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार गृहमंत्र्यांना आहे. सीमाभागातील मराठी भागावर अन्याय होतोय, चिरडलं जातंय, भरडलं जात आहे. असे संजय राऊत यांनी सांगितले.