Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'च्या नावाखाली मोठा स्कॅम; चार जण  अटकेत

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'च्या नावाखाली मोठा स्कॅम; चार जण अटकेत

या प्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा असलेली बघायला मिळते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलेला दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतो. 'लाडकी बहीण योजने'च्या नावाखाली आता मोठ्या प्रमाणात स्कॅम् होत असलेलादेखील निदर्शनास आला आहे. सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करुन त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते उघडावं लागतं. याचा फायदा घेत प्रतीक पटेल या व्यक्तीने बनावट बँक खाती उघडली. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये अविनाश कांबळे, फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास घेण्यास सुरुवात केली होती. आरोपींच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक बँक पासबुक, सीमकार्ड्स पोलिसांना मिळाले आहेत.

त्याचप्रमाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 पेक्षा अधिक बँक खाती बंद केली आहेत. 19.43 लाख रुपयांची रोकडदेखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील 25 वर्षीय आरोपी अविनाश कांबळे याने नेहरूनगर, देवनार, धारावी या परिसरातील लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लोकांकडून कागदपत्रे घेऊन बँक खाती उघडायचा आणि त्यांना लगेच एक हजार रुपये द्यायचा.त्याने बँक खाते सुरु केले आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील असेही तो सांगत असे. असे करुन त्याने प्रत्येक खात्यामागे 4 हजार रुपयांची कमाई केली आहे.

जुहू पोलिसांनी अविनाश कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक बँक खाती उघडल्याचं निष्पन्न झालं. बँक खाती उघडताना बँकेने संबंधित ग्राहकाच्या पत्त्याची शहानिशा करणं आवश्यक असते. मात्र बँक ते करत नाही. याचाच फायदा घेत आरोपींनी नागरिकांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने शेकडो बँक खाती उघडली, असं जुहू पोलिसांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com