Maharashtra Top In Digital Payment : UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
महाराष्ट्राचा UPI व्यवहारांमध्येही पहिला क्रमांक लागला आहे. महाराष्ट्राने डिजिटल पेमेन्टमध्ये सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करत इतर राज्यांच्या तुलनेत तब्बल डबल आकडेवारीसह पहिल्या क्रमांकावर आपले स्थान पटकावले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार केले जात आहेत. डिजिटल पेमेंट क्रांतीचं नेतृत्व करणाऱ्या युपीआय (UPI) व्यवहारांमध्ये 2025 मध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 23 टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, युपीआयच्या माध्यमातून मे-जून महिन्यात 18.68 अब्ज व्यवहार झाले असून त्यांची एकूण किंमत 25 लाख कोटींहून अधिक आहे. युपीआयमुळे भारताची आर्थिक व्यवस्था वेगाने कॅशलेस आणि डिजिटल होत आहे. जागतिक नेतृत्वात भारताचा UPI आघाडीवर आहे. देशातील जवळजवळ 90 टक्के व्यवहार हे UPI चा वापर करून केले जातात. नुकत्याच राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यातर्फे जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तब्बल 13.19 पॉइंटने महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून कर्नाटक 7.77 पॉईंटसह दुसऱ्या तर उत्तर प्रदेश 7.50 पॉईंटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
याबाबात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर माहिती पोस्ट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांच्या DigitalIndia या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमासाठी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांच्या या उपक्रमामुळेच आज महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतात डिजिटल क्रांती झाली आहे. डिजिटल सेवा सुरक्षित, समावेशक आणि सर्वांसाठी सुलभ बनवणे हे आमचे कर्तव्य असून महाराष्ट्र राज्य तुमचे ध्येय आणि उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी सदैव वचनबद्ध आहे, अशा शब्दात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासन दिले.