Abu Azmi : वादग्रस्त विधानानंतर अबू आझमींची माफी, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
पंढरपूरच्या वारीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी राज्यभरातून झालेल्या तीव्र टीकेच्या केंद्रस्थानी आले. अनेक वारकरी संघटना आणि सामाजिक संस्थांनी त्यांच्या विधानाचा निषेध करत नाराजी व्यक्त केली. यानंतर आता अबू आझमी यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त करत स्पष्ट केले आहे की, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता.
सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, “वारी परंपरेबाबत मी ज्या शब्दांचा उल्लेख केला, तो केवळ सरकारच्या दुटप्पी धोरणांकडे लक्ष वेधण्यासाठी होता. जर माझ्या विधानामुळे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो आणि मनापासून माफी मागतो.”
आझमी यांनी वारी परंपरेचा सन्मान करत तिचा गौरवही केला आहे. ते म्हणाले, “वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अभिमानास्पद भाग आहे. मी स्वतः त्या परंपरेचा आदर करतो.” त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वारी पालखीचा उल्लेख मुस्लिम समुदायाच्या संदर्भात भेदभावाची भावना निर्माण होऊ नये, यासाठी केला होता.
ते पुढे म्हणाले, “माझा हेतू कोणतीही तुलना करण्याचा नव्हता, तर सरकारच्या भेदभावपूर्ण धोरणाकडे लक्ष वेधणे हाच उद्देश होता. आम्ही समाजाच्या हक्कांसाठी लढत राहू, पण देशाच्या एकतेला कधीही बाधा येऊ देणार नाही.” दरम्यान, सोलापुरात माध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी असे विधान केले होते की, “वारकरी वारीमुळे रस्ते जाम होतात तरी आम्ही कधी तक्रार केली नाही, पण नमाज पठणासाठी रस्त्यावर थांबले तर मुस्लिमांविरोधात कारवाईची भाषा केली जाते.” त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.