Nana Patole : " 'त्या' आमदारावर कारवाई झाली पाहिजे" ; विधानभावनातील राड्यावरुन नाना पटोलेंची मागणी
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या आवारात मोठा गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकत्याच घडलेल्या वादाचा उल्लेख केला. त्यांनी विधानसभेत सांगितले की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत त्यांचा काही दिवसांपूर्वी झालेला वाद, तसेच त्यानंतर मिळालेल्या धमक्यांचा त्यांनी मुद्दाम उल्लेख केला होता. त्यानंतर काही वेळातच विधानभवनाच्या लॉबीत दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळून आला. यामध्ये आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि पडळकर यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
या झटापटीत गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला. त्यातून वातावरण चिघळल्याचे पाहायला मिळाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "आवारामध्ये गुंडवृत्तीची लोकं आणून आमदारावर जीवघातक मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय. टकले नावाच्या ज्या कार्यकर्त्याचं नाव पुढे येत आहे याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. तो कोणाच्या माध्यमातून इथे आलेला होता, हे सगळं आता विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी तपासलं पाहिजे. ज्या आमदाराबरोबर आला असेल, ज्या आमदारांनी त्याला आणलं असेल, त्या आमदारावर कारवाई झाली पाहिजे.
अशा पद्धतीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचं पाप जर सरकार आणि सरकारमधले लोक करत असतील, तर ती गंभीर बाब आहे. मला जी माहिती मिळाली होती, ती म्हणजे जितेंद्र वडावरच जीवघातक हमला करण्यासाठी त्या ठिकाणी त्या पद्धतीचे लोक मुद्दाम आणले गेले होते – अशी माहिती माझ्याकडे आहे. आता विधानसभा अध्यक्ष, सभापती आणि मुख्यमंत्री यांनी यावर चौकशी करावी, आणि तात्काळ त्या पद्धतीची कारवाई करावी, ही भूमिका आमची राहील. पण अशा पद्धतीने जर महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रथा, परंपरांना आणि विधानसभेच्या सन्माननीय परंपरांना काळीमा लावण्याचं काम होत असेल, तर ते कदापी सहन केलं जाऊ शकत नाही."
नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.